प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत दोन स्वयंसेवकांना देण्यात आला ऑक्सफर्ड-सिरमच्या लसीचा पहिला डोस


पुणे – पुण्याच्या दोन स्वयंसेवकांना आज भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला असून ऑक्सफर्ड-सिरमच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात घेण्यात आल्याची माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. ०.५ एमएलचा डोस या दोन स्वयंसेवकांना देण्यात आला. या लसीचे उत्पादन पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात झाले असून पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी कोरोना लसीचा डोस दिला. तत्पूर्वी त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतरच हा डोस देण्यात आला.

लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे. त्याचबरोबर या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर पुढचे काही दिवस डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल. मंगळवारपासून या लसीसाठी चाचणी प्रक्रिया सुरु झाली होती. या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून मंगळवारी तीन पुरुष आणि महिलांची तपासणी करण्यात आली.

ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने बनवली असून ‘कोव्हिशिल्ड’ या नावाखाली भारतात या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटीश-स्वीडन फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेकासोबत देशात एक अब्ज लसीचे डोस बनवण्याचा करार केला आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने तीन ऑगस्ट रोजी सिरमला फेज २ आणि ३ ची मानवी चाचणी घेण्याची परवानगी दिली. भारतात या लसीची मानवी चाचणी एकूण १७ वैद्यकीय संस्थांमध्ये होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे चालवले जाणारे परेलमधील केईएम हॉस्पिटल आणि मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ऑक्सफर्डची लस यशस्वी ठरली असून धोकादायक कोरोना व्हायरपासून ही लस टोचल्यानंतर दुहेरी संरक्षण मिळू शकते, असे संशोधनातून समोर आले आहे. ही लस म्हणजे कोरोना विरोधात महत्त्वाचा शोध असल्याचे संशोधक मानत आहेत. लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजसोबतच किलर ‘टी-सेल्स’ची निर्मिती झाल्याचे दिसून आले.