आमचे ते पाप आणि तुमचे ते पुण्य; मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका


मुंबई – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला घाबरायचे की त्यांच्याविरोधात लढायचे याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचे म्हटले आहे. आम्ही केले तर ते पाप आणि त्यांनी केले तर ते पुण्य असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन लगावला. तसेच सामान्य जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि तो दाबण्याचा जर प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणे आपले कर्तव्य असल्याचेही यावेळी ते म्हणाले. काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले.

आपल्याला या सरकारला घाबरायचे आहे की त्यांच्याविरोधात लढायचे हे आधी आपल्याला ठरवले पाहिजे. अन्यथा आपण रोज भेटत राहू आणि अशाच चर्चा करत राहू, जर आपल्याला लढायचे असेल तर मग ते कोणत्याही किंमतीत केलेच पाहिजे, असे मत उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडले. त्याचबरोबर केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, विरोधी पक्षात ते आहेत किंवा इतर पक्षांबद्दल ते वाईट विचार करतात असे नाही. पण तेदेखील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत. आपले देखील काही हक्क आहेत. एका व्यक्तीच्या हातात आज सर्व सत्ता आहे. पण मग राज्य सरकारांचा काय उपयोग? देश एकच व्यक्ती चालवणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का ? हे होणार नाही. जर आपण राज्यघटनेला मानणार नसू तर मग लोकशाही कुठे आहे?, असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलताना म्हटले की, अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुले कोरोनाबाधित झाल्याचे रिपोर्ट आहेत. आपल्याकडे जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय करणार आहोत?. राज्यातील लॉकडाउन शिथील केला जात असतानाही शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोना संकट लवकर टळाव आणि समोरासमोर बसून आपण चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. जे काही करु ते एकत्र मिळून करु, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

पुन्हा लॉकडाउनमध्ये जाण्याची इच्छा नसल्याने धीम्या गतीने निर्बंध शिथील करत असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारकडे एक योग्य प्रोगाम घेऊन आपण गेले पाहिजे, केंद्र सरकारकडे आपण भीक नाही तर आपले हक्क मागत आहोत. पंतप्रधान आणि राज्य सरकार निवडणारी लोक सारखीच आहेत. पण आपण केले की पाप आणि त्यांनी केले की पुण्य होते. सर्वसामान्य जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि जर तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणे आपले कर्तव्य असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.