जेईई आणि नीट परीक्षांसाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव; शिक्षणमंत्र्यांचा दावा


नवी दिल्ली – सध्या केंद्र सरकारवर राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) घेण्यावरुन सर्वच स्तरावरुन टीका होत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान या परीक्षासाठी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

त्याचबरोबर शिक्षणमंत्र्यांनी जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचे सांगितले आहे. आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती, असे त्यांनी सांगितले आहे. जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचे रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले आहे.

गृह तसेच आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल, असे शाळा सुरु करण्यासंबंधी विचारण्यात आले असताना सांगितले आहे. दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे.

परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. जर एखाद्याचे शरीराचे तापमान जास्त असेल तर त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष ठेवण्यात आला आहे. पण परीक्षा घेण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. आपण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना संकटात टाकत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर हा निर्णय चुकीचा असल्याचे स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गनेही ट्विट करत म्हटले आहे.