आता प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात


मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी आता वारकरी संप्रदायाच्या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आल्याने वंचित बहुजन आघाडी आता पुरोगामी विचाराकडून उजव्या विचाराकडे वळू लागल्याचा धसका अनेकांनी घ्यायला सुरुवात झाली आहे.

कधीही देव न मानणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी देव आणि धर्म हे सनातनी मंडळींचे मुद्दे हाती घेतल्याने राज्यातील मंदिर उघडणे हा केवळ एक मुद्दा बनला असून खरे आंबेडकरांनी विचारमंथन डावे आणि उजव्या विचारसरणीचे अंतर कमी करण्यासाठी टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे काय याच विचाराने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत.

तर वारकरी संप्रदायातून आंबेडकरांचे हे पाऊल अतिशय योग्य असल्याचा निर्वाळा येत असून मंदिरे उघडल्यावर देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि याचा उपयोग कोरोनाविरोधातील लढ्यासाठी होईल, असा विश्वास वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ नेते माधवमहाराज शिवनीकर यांना आहे. मंदिरे उघडणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे राज्यातील दारू दुकाने सुरु झाली, सर्व व्यवहार सुरु झाले, लग्न कार्ये होऊ लागली मग भजन कीर्तन करणे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करणे का सुरु होत नाही, असा सवाल करतात. आम्ही हे आंदोलन याचसाठी सुरु केले असून जेव्हा सरकार आणि शास्त्रज्ञांना अजून लस शोधण्यात यश येत नाही, तेव्हा किमान मंदिरामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जा तरी आम्हाला मिळवता यावी अशी भूमिका मांडतात. सरकारकडे यासाठी वारंवार मागणी करूनही सरकार विचार करत नसल्याने आम्ही हे आंदोलन बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून सुरु केल्याचे सांगतात. सरकारने निर्णय न घेतल्यास 31 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार असल्याचे अरुण महाराज सांगतात.

आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप केला आहे. कोणताही जनाधार विश्व वारकरी सेनेला नसल्याने 100-200 लोके कशीतरी जमा होतील, पण यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचा आरोप सर्वगोड यांनी केला आहे.

आंबेडकरांचे मंदिर उघडणेबाबतचे आंदोलन हे केवळ राजकीय असल्याचा आरोप भगताचार्य बाळासाहेब बडवे यांनी केला आहे. एका बाजूला वारकरी संप्रदायातून मंदिर खुले करण्याबाबत मिळणार वाढत पाठिंबा हे आंबेडकरांच्या विचारांचा विजय असल्याचे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक वामनराव धांडोरे याना वाटत आहे. नेहमीच बहुजनातील वंचितांच्या बाजूने आंबेडकर हे उभे राहत आले आहेत. मंदिरे बंद झाल्याने हजारो बहुजन कुटुंबासोबतच काही ब्राम्हण कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी मंदिरे उघडल्यास हजारो गोरगरीब कुटुंबाला जगात येणार असल्यानेच आंबेडकरांनी हा मुद्दा हातात घेतल्याचे धांडोरे याना वाटते. यामुळे आंबेडकरांना राजकीय फायदा होईल पण हिंदू धर्म पेटंट म्हणून ज्यांनी आजवर वापरला त्यांना आंबेडकरांची भूमिका नक्कीच अडचणीची असल्याचे धांडोरे सांगतात.

वास्तविक या भूमिकेमुळे डावे व उजवे विचारसरणीतील अंतर कमी होऊन सामाजिक विषमता कमी होईल असा विश्वास धांडोरे याना वाटतो. आज हे नुसते मंदिर उघडण्याचे आंदोलन वाटत असले तरी भविष्यात यामुळे मोठी सामाजिक समता येईल असा विश्वास धांडोरे व्यक्त करतात. वास्तविक मंदिराच्या प्रश्नावर मताची बेगमी करणारे भाजप-शिवसेना यांनी वारकरी संप्रदायाला या प्रश्नावर वाऱ्यावर सोडून दिल्यावर डाव्या विचाराचे म्हणून ओळखले जाणारे प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न हाती घेतल्यावर आता आंबेडकर मायावतींचे मार्गावर निघाले अशी हाकारी काही मंडळी देऊ लागली असली तरी कोरोनाच्या अडचणीच्याकाळात वारकरी संप्रदायाच्या मदतीला आंबेडकर धावून आल्याने आज वारकरी संप्रदायाला वंचित आपलेसे वाटू लागले आहे. आंबेडकरांनी जरी राजकारणासाठी सॉफ्ट हिंदुत्व जवळ करण्यास सुरुवात केली असली तरी यामुळे समाजातील विषमता कमी होईल, असा विश्वास डाव्या चळवळीतील अभ्यासकांना वाटत आहे.