देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींवर भाष्य


मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीमधील कुरबुरी, काँग्रेसची नाराजी, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद यावरून काँग्रेसला लक्ष करत, महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे, याकडे आम्ही लक्ष देणार नाही. पण स्वत:चा अध्यक्ष जो पक्ष ठरवू शकत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला लगावला आहे.

सध्या देशातील राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या अध्यक्षपदाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. गांधी कुटुंबातील पक्षाचा भावी अध्यक्ष असावा की बाहेरील, यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यावर देशभरातील काँग्रेसचे नेतेही आपली मते मांडत आहेत. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही मागे नाहीत. राहुल गांधी यांच्या नावाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठाम पाठिंबा दिला आहे. तर त्यांच्याही पुढे जाऊन वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असे विधान केल्यामुळे राज्यातील सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

फडणवीस यांना वडेट्टीवारांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, आता या सगळ्याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही. ऐवढे वाद एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात आहेत. अध्यक्षपदी सोनिया गांधींना राहायचे नाही. पण त्यांनाच राहावे लागत आहे. अध्यक्ष पदाचा निर्णय जे घेऊ शकत नाहीत, ते पुढचे निर्णय कसे घेणार?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या पक्षाची अशी अवस्था का झाली याचे आत्मचिंतन करायला हवे, असे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार ही अनैसर्गिक आघाडी असून त्यांचा आपआपसातच खूप अंतर्विरोध असल्यामुळे सरकार जितके दिवस चालले आहे, तितके दिवस चालेल आणि एक दिवस हे सरकार देखील जाईल. देशाच्या राजकारणात अशी आघाडी फार काळ कधीच चाललेली नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Loading RSS Feed