बच्चू कडूंचा प्रस्ताव; उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करुन जानेवारी 2021 पासून सुरू करा शाळा


अमरावती – देशासह राज्यावर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावलेले असल्यामुळे अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. यातच अनेक राजकीय नेत्यांसह पालकांनी जानेवारी महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी देखील अशीच मागणी केली आहे. राज्यातील शाळा जानेवारी महिन्यापासून सुरू कराव्या, त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी रद्द करावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, राज्यातील शाळा कोरोनामुळे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. राज्यात सध्याच्या काळात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे, पण त्याची गरज नाही. शैक्षणिक विषमता यातून निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षण हे सार्वत्रिक असायला हवे, ते सर्वांना समान मिळाले पाहिजे. यातून गरीब आणि श्रीमंत विषमता निर्माण होऊ नये. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, यांच्यासोबत या संदर्भात अनेकदा व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे बैठका झाल्या आहेत. यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे. 100 टक्के शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.