अनन्या आणि ईशानच्या ‘Khaali Peeli’चा टीझर रिलीज


करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांड्ये ही जोडी लवकरच एका चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘खाली पिली’ (Khaali Peeli) या चित्रपटाची चर्चा सुरु होती. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. धडाकेबाज अंदाजामधील त्यांचा पहिला टीझर चित्रपटात मुंबईचे दर्शन घडवणार आहे. तर या चित्रपटाद्वारे ईशान आणि अनन्या नॉन ग्लॅमरस आणि हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

मकबूल खान दिग्दर्शित ‘खाली पिली’ या चित्रपटात ईशान खट्टर ‘ देढ शहाना’ तर अनन्या पांडे ‘तिखी छुरी’च्या व्यक्तिरेखेत आपल्या समोर येणार आहेत. या दोन कलाकारांसोबतच मुंबईची ओळख असणारी कालीपिली टॅक्सी देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असला तरीही अद्याप चित्रपट केव्हा रिलीज होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे मागील काही महिने ठप्प पडलेले व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहे. चित्रीकरणासोबतच अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यास देखील सुरूवात केली आहे.