अन् प्रवीण तरडे यांना मागावी लागली जाहीर माफी


मुंबई : कालपासून राज्यात गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. राज्यातील नागरिकांचे जगणे कोरोनामुळे अस्तव्यस्त झाले असले, तरी अनेकांनी आपल्या कुवतीप्रमाणे बाप्पाचे स्वागत केले आहे. त्याला अनेक कलाकारही अपवाद नाहीत. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, संदीप पाठक आदी अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आपल्याला जमेल तशी आरास करून प्रत्येकाने बाप्पाची मनोभावे पूजा केली. त्याचबरोबर अनेक चित्रपटांचे लेखन करणारे आणि मुळशी पॅटर्नसारखा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक-निर्माते प्रवीण तरडे यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. पुस्तक बाप्पा अशा संकल्पनेवर आधारित त्यांनी बाप्पाची केलेली आरास आहे. पण त्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झाला आहे.

आरास करताना बाप्पाच्या दोन्ही बाजूंना आपल्या घरी असलेली पुस्तकांची प्रवीण यांनी सजावट केली आहे. तर काही पुस्तके मधोमध रचून पुस्तकांवर बाप्पा ठेवला होता. त्यात त्यांनी सर्वात वर भारतीय राज्यघटना ठेवून त्यावर बाप्पा ठेवला होता. गणपती ही बुद्धीची देवता असल्यामुळे त्यांनी अशी रचना केली होती. पण त्यातून अनेकांच्या भावना दुखावल्या. भारतीय राज्यघटना ही सर्वात वर असते, त्यावर बाप्पा ठेवून प्रवीण यांनी अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्याचा निरोप प्रवीण यांच्यापर्यंत गेला. काही संघटनांचे फोनही त्यांना आले. या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी नोंदवल्यानंतर प्रवीण यांनी एक नवा व्हिडिओ शेअर करून या प्रकारामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागितली आहे. तशा आशयाचा व्हिडिओ प्रवीण तरडे यांनी अनेक प्रसार माध्यमांना, त्याचबरोबर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मित्रांनो चुकून झालेल्या गोष्टी साठी जाहीर माफी … माझी भावना खुप वेगळी होती .. 🙏🙏🙏

Posted by Pravin Vitthal Tarde on Saturday, 22 August 2020

ते या नव्या व्हिडिओत म्हणतात, पुस्तक गणपती अशी माझ्या घरी संकल्पना होती. बुद्धीची देवता बाप्पा आणि बुद्धीचे मोठे प्रतीक म्हणजे भारतीय संविधान अशी यामागची संकल्पना होती. पण ती माझी चूक होती, हे काही संघटनांनी, काही मंडळींनी माझ्या लक्षात आणून दिले. आरपीआय, भीम आर्मी, लातुरची संघटना असेल, त्याचबरोबर पुण्यातील संघटना असतील तर मी सर्व दलित बांधवांची आणि ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्या सर्वांची जाहीर माफी मागतो. माझी चूक मान्य करतो. मी सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. पुन्हा अशी चूक होणार नाही. भारतातील नव्हे, तर जगभरातील सर्वांची मी माफी मागतो. मला माफ करा.