भारतात होणार रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन?


नवी दिल्ली : सोव्हिएत संघ म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याची घोषणा केल्यानंतर आता लसीच्या उत्पादनासाठी भारतासोबत भागीदारी करण्यास रशिया इच्छुक आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लस ‘स्पुतनिक व्ही’ चे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची इच्छा रशियाने दर्शवली आहे. यासंदर्भात माहिती देताना रशिया कोरोना प्रतिबंधक लस ‘स्पुतनिक व्ही’ चे उत्पादन करण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचा विचार करत असल्याचे रशियन थेट गुंतवणूक निधीचे (आरडीआयएफ) मुख्य अधिकारी (सीईओ) किरिल दमित्रिव यांनी म्हटले आहे.

दमित्रिएव एका वेबिनारमध्ये बोलताना म्हणाले की, या लसीचे उत्पादन करण्यासाठी लॅटिन अमेरिकन, आशिया आणि पश्चिम आशियाचे अनेक देश इच्छुक असून या लसीचे उत्पादन करणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही सध्या भारतासोबत भागीदारी करण्यावर विचार करत आहोत. लस उत्पादन करण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण लसीचे उत्पादन करण्यासाठी होणारा हा करार लसीची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षण बनवणार आहे. रशिया आंतरराष्ट्रीय सहभागाची आशा करत आहे.