प्रशांत भूषण यांची शिक्षेची सुनावणी लांबणीवर टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव


नवी दिल्ली – न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणात शिक्षेबाबत सुनावणीच्या एक दिवस आधी, अवमानासाठी दोषी ठरवण्यात आलेले वकील प्रशांत भूषण यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल होईपर्यंत व तिच्यावर विचार होईपर्यंत शिक्षेबाबत सुनावणीची कार्यवाही लांबणीवर टाकावी, यासाठी धाव घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी भूषण यांना न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या दोन अवमानकारक ट्विट्सबद्दल फौजदारी स्वरूपाच्या अवमानासाठी दोषी ठरवले होते. जनहितासाठी केलेली वाजवी टीका या ट्विट्सला म्हटले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. भूषण यांना या प्रकरणी दिल्या जाणाऱ्या शिक्षेबाबतचा युक्तिवाद आपण २० ऑगस्टला सुनावू, असे न्यायालयाने सांगितले होते. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला ६ महिन्यांपर्यंतची कैद व २ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते.

१४ ऑगस्टचा आदेश विशेषत: मुक्त भाषणाबाबत घटनात्मकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या आदेशाचा सखोल अभ्यास केल्यानंतर आणि योग्य अशा वकिलाची मदत घेऊन त्याविरुद्ध फेरविचार याचिका करण्याचा आपला विचार असल्याचे भूषण यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे.