मुंबई – गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या या मागणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पण आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावली केली. त्यानुसार, सीबीआयने या घटनेचा तपास करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश सीबीआयला दिले आहेत. त्याचबरोबर सीबीआयला मुंबई पोलिसांनी सहकार्य करावे, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या. पार्थ पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आनंद व्यक्त करत शेवटी सत्याचाच विजय झाल्याचे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पार्थ पवारांचा आनंद गगनात मावेना
पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी भेट घेतली होती. पार्थ पवार यांनी त्यावेळी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याप्रकरणी मत मांडत पार्थ यांना अपरिपक्व असल्याचे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश