आदित्य ठाकरेंच्या उल्लेखाविषयी रिया चक्रवर्तीच्या वकिलांचे स्पष्टीकरण


मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाशी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्यावरुन आता स्पष्टीकरण दिले असून आदित्य ठाकरेंना रिया कधीच भेटली नाही. तिला फक्त आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत ऐवढेच ठाऊक आहे, त्याचबरोबर रिया फक्त एका कार्यक्रमामध्ये अभिनेता डिनो मोरियाला भेटल्याचे सांगितले आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार यासंदर्भातील अधिकृत स्टेटमेंट सतीश मानशिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यात ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना रिया ओळखत नाही आणि तिने कधीच त्यांची भेटसुद्धा घेतली नाही. रियाने कधीच फोनवरून किंवा इतर कोणत्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा बोलली नाही. तर अभिनेता डिनो मोरियाला रिया ओळखत असून इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून काही कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली होती.

रियावर पैसे उकळल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. रिया व तिच्या कुटुंबीयांची याप्रकरणी ईडी चौकशी करत आहे. तिच्या वकिलांनी याविषयी पुढे म्हटले, मुंबई पोलीस व ईडीने रियाला समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती चौकशीसाठी उपस्थित होती. रिया आणि सुशांत यांच्यातील नाते आणि तिच्या आर्थिक गोष्टींबाबत मुंबई पोलीस व ईडीने कसून चौकशी केली.

याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत. पोलिसांच्या तपासाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सुपूर्द करण्यात आला आहे. रियावर अजूनही बरेच आरोप करण्यात येत आहेत. पण या सर्व आरोपांवर ती गप्प आहे.