सर्वाधिक श्रीमंतांच्या TOP-5 मधून मुकेश अंबानी बाहेर


नवी दिल्ली – मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये लॉकडाउनच्या दरम्यान मागील तीन-चार महिन्यांमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केल्यामुळे रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन काही दिवसांपूर्वीच अब्जाधीश मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. पण, रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घट झाल्याचा परिणाम अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर झाला आहे.

जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीमध्ये आता मुकेश अंबानी यांची पाचव्या स्थानावरुन थेट सातव्या स्थानी घसरण झाली आहे. अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट आणि टेस्ला व स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे अंबानींची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 78.3 अब्ज डॉलर आहे. तर, 78.6 अब्ज डॉलर संपत्तीसह एलॉन मस्क सहाव्या स्थानी आहेत.

दुसरीकडे, 79.5 अब्ज डॉलर संपत्तीसह वॉरेन बफेट प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार पुन्हा एकदा पाचव्या स्थानी आले आहेत. मुकेश अंबानी यांनी 22 जुलै रोजी वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली होती. त्यांची संपत्ती त्यावेळी 75.1 अब्ज डॉलर एवढी होती, तर बफेट यांची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर एवढी होती.

केवळ मुकेश अंबानी फोर्ब्सच्या जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीमध्ये एकमेव आशियातील व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस 190 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अव्वल स्थानी कायम आहेत. तर, माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 114 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.