Micromax होणार आत्मनिर्भर; काढणार चिनी कंपन्यांवर वचपा


नवी दिल्ली – 7-8 वर्षांपूर्वी भारतीय मोबाईल बाजारपेठेवर भारतीय स्मार्टफोन निर्माता Micromax कंपनीचे अधिराज्य होते. पण ज्यावेळी भारतीय बाजाराचे दरवाजे ठोठावायला चिनी कंपन्यांनी सुरुवात केली, त्यावेळी ही कंपनी भारतीय बाजारपेठेतूनच गायब झाली. त्याचबरोबर चायना मोबाईलमुळे भारतीय ग्राहकांनी मायक्रोमॅक्सकडे पाठ फिरविली. आता चिनी वस्तूंवर गलवान घाटीतील तणावामुळे बहिष्कार टाकण्यात येत असल्यामुळे चिनी कंपन्यांवर वचपा काढण्याचा निर्णय मायक्रोमॅक्सने घेत भारतीय बाजारपेठेत पुन्हा ही कंपनी दाखल होत आहे.

आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून भारतीय ग्राहक अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही भारतीय बाजारपेठे जम बसविण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच भारतीय म्हणून मायक्रोमॅक्सला पुन्हा सुगीचे दिवस येण्याची शक्यता असून यासंदर्भातील संकेत मायक्रोमॅक्सने ट्विट करून दिले आहेत.

या स्वातंत्र्य दिनी एका व्हिडीओ सोबत मायक्रोमॅक्सने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कंपनीने म्हटले आहे की, आम्ही लवकरच भारतीय बाजारात नवे स्मार्टफोन लाँच करत आहोत. कंपनीचे सह संस्थापक राहुल शर्मा यांनीही त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, चला नवीन सुरुवात करुया! यामुळे पुढील काही महिन्यांत भारतीय बाजारात मायक्रोमॅक्सचे नवे स्मार्टफोन पहायला मिळणार आहेत. पण सध्यातरी नवीन स्मार्टफोन कोणते अणि कसे असतील याबाबत मायक्रोमॅक्सने काहीच माहिती दिलेली नाही.

कंपनी काही दिवसांपूर्वी एकाचवेळी 3 फोन लाँच करणार असल्याचे समजले होते. हे तिन्ही फोन कमी बजेटमधील असतील आणि दमदार फिचर्स देण्यात येतील. केंद्र सरकारच्या PLI योजनेचाही फायदा मायक्रोमॅक्सला मिळणार आहे. या योजनेतून मोदी सरकार भारतात मोबाईल बनविणाऱ्या कंपन्यांना 4-6 टक्के प्रोत्साहन निधी देणार आहे.