बैरूतमधील जखमींसाठी मिया खलिफाने ‘ही’ गोष्ट विकत जमवला ७४ लाखांचा मदतनिधी


४ ऑगस्ट रोजी लेबेनॉनची राजधानी असणाऱ्या बैरुतमध्ये झालेल्या अमोनियम नायट्रेटच्या भीषण स्फोटामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानीही झाली होती. काही दिवसांचा कालावधी या स्फोटाला लोटला असला तरी अद्यापही मृतांची संख्या वाढत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

दरम्यान बैरुतमधील जखमींसाठी जगभरामधून मदतीचा ओघ सुरु झालेला असतानाच पूर्वश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफा हिने देखील बैरुत स्फोटात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आपल्या चष्म्याचा लिलाव केला आहे. दरम्यान मियाच्या या चष्म्याला एका चाहत्याने एक लाख डॉलरच्या बोलीमध्ये विकत घेतला आहे. म्हणजेच मियाने चष्म्याचा लिलाव करुन लेबेनॉनसाठी ७४ लाख ८५ हजारहून अधिकचा मदतनिधी गोळा केला आहे.

१७८ जणांचा मृत्यू बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात झाला असून सहा हजार जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान मियाने तिच्या इन्टाग्राम पोस्टमध्ये या स्फोटामधील जखमींना मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे म्हटले होते. थोडे क्रिएटीव्ह होण्याचा मी प्रयत्न करत असून एखाद्या कामासाठी मदतनिधी उभारण्यासाठी वेगळे मार्ग निवडले जाऊ शकतात. पण यामुळे मूळ समस्या आणि हेतूवरुन आपले लक्ष विचलित होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असे मियाने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले होते.

त्याचबरोबर यासाठी नकारात्मक पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींचेही स्वागत आहे. कारण आमच्या पैशांना जितकी किंमत आहे तितकीच तुमच्या पैशाला आहे. माझ्या बायोमध्ये मी काही तासांसाठी एक लिंक पोस्ट करत आहे. ती लिंक नंतर मी बैरुत मदतनिधीसाठीच्या पेजवर डायरेक्ट करणार आहे. नंतर मी काही लिंक आणि पोस्ट पिन्ड मेममरीमध्ये पोस्ट करेन, असे मियाने पोस्टमध्ये म्हटले होते.

मियाने तिचा चष्मा या लिंकवर लिलावात काढल्याची पोस्ट होती. तिने ‘युज्ड अॅण्ड अब्युज्ड’ या मथळ्याखाली चष्माच्या लिलाव केला. हा चष्मा म्हणजे सर्वोत्तम प्रॉप आहे. जर तुम्हाला हवा असेल तर मी यावर ऑटोग्राफही द्यायला तयार आहे. या चष्म्याला त्याच्या नव्या घरी (विकत घेणाऱ्याकडे) पाठवण्याआधी तो एकदा मी शेवटचा वापरत असल्याचे मियाने म्हटले होते.

त्याचबरोबर तिच्या आणखीन काही खासगी गोष्टींही मियाने लिलावासाठी उपलब्ध असल्याच्या पोस्ट मागील काही दिवसांमध्ये केल्या आहेत. या गोष्टींच्या लिलावामधून २५ हजार डॉलर म्हणजेच १८ लाखांपर्यंतचा निधी गोळा करण्याचा तिचा हेतू आहे. यासंदर्भातील पोस्ट करताना मियाने, आपल्याला शक्य असेल तितका निधी आपण गोळा केला पाहिजे. सध्या लेबेनॉन रेड क्रॉसला आपल्या मदतीची गरज आहे. तुम्हाला या गोष्टी विकत घेण्यात रस नसेल तर तुम्ही थेट लेबेनॉन रेड क्रॉसच्या वेबसाईटवर निधी दान करु शकता, असे देखील म्हटले होते