लवकरच 13 देशांसोबत सुरू होणार विमान सेवा, पुरी यांची माहिती

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होत आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती दिली की भारत आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी विविध देशांशी चर्चा करत आहे.

हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, भारत आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी द्विपक्षीय अस्थायी व्यवस्था (एअर बबल) सुरु करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापूरसह 13 देशांसोबत चर्चा सुरू आहे. याच प्रकारच्या व्यवस्थेसह दोन्ही देशातील विमान कंपन्या काही निर्बंधांसह आंतरराष्ट्रीय उड्डाण संचालित करू शकते.

भारताने जुलैमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, यूएई, कतार आणि मालदीवसोबत देखील याच व्यवस्थेंतर्गत विमान सेवा सुरू केली होती.

पुरी यांनी माहिती दिली की, या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, न्यूझीलंड, नायजेरिया, बहरीन, इस्त्रायल, केनिया, फिलिपाईन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलंडचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूटानला देखील असाच प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.