दिलेल्या शब्दाला जागला सोनू सूद, पुण्याच्या ‘त्या’ आजीबाईंचे ट्रेनिंग सेंटर होणार सुरू


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या मजूंराचे फार हाल झाले होते. याच दरम्यान अभिनेता सोनू सूद त्या मजूरांसाठी देवदूत बनून त्यांच्या मदतीसाठी धावून आला. या लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने या मजूरांची सुखरूप घरवापसी केली आहे. दरम्यान अद्यापही अशा गरजू लोकांची मदत सोनू सूद करत आहे. मजूरांची घरवापसी केल्यानंतर आता त्याच लोकांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीपासून सुरू झालेला त्याच्या समाजसेवेचा व्याप दिवसेंदिवस वाढतच आहे.

याच दरम्यान पुण्यातील एका वॉरिअर आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवर सोनू सूदची नजर पडली आणि त्याने तो व्हिडीओ शेअर करत आजीबाईंना शोधण्याची मोहिम हाती घेतली, त्याचबरोबर वृद्ध आजीबाईंना एक ऑफरच देऊ केली होती. सोनूने महिलांना स्व-संरक्षणाची ट्रेनिंग देण्याचा विचार केला होता. आता, सोनू दिलेल्या शब्दाला पुन्हा एकदा जागला असून, लवकरच ते सत्यात उतरणार आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने एक व्हिडिओ शेअर केला होता. एक वयोवृद्ध आजीबाई त्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत होत्या. सोनूला या आजीबाईचा व्हिडिओ पाहून चांगली आयडिया सूचली. मी आजीबाईंना घेऊन महिलांसाठी, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणारे स्कुल सुरू करु इच्छित असून या आजीबाई व त्यांच्या संपर्काबद्दल कुणी मला माहिती देता का, असे सोनूने म्हटले होते. या वॉरिअर आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जगभरातून आजींना मदत मिळाली. विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आजीची भेट घेऊन साडी चोळीचा अहेर करत 1 लाख रुपयांची मदत केली होती.

Warrior_aaji यांची रविवारी निर्मिती परिवारातील सदस्यांनी भेट घेतली. येणाऱ्या बावीस ऑगस्टला शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न “निर्मिती फाऊंडेशन” सत्यात उतरवत आहे. यासाठी सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून आजीचे हक्काचे व्यासपीठ लवकरच त्यांना मिळणार असल्याची माहिती निर्मित्ती फाऊंडेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. त्यामध्ये, या युवकांनी सोनू सूदचा विशेष उल्लेख केला आहे. समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलेल्या सोनू सूदने आपल्या कामातून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकत आहे. त्यात, आजीबाईंना दिलेल्या या ऑफरनंतर शब्द पाळल्यामुळे सोनू सूद आणखी मराठी जनांच्या मनात बसला आहे.