बैरुतची पुनरावृत्ती? बोईसरमधील केमिकल फॅक्ट्रीतील स्फोटाचे 10 किमीपर्यंत जाणवले धक्के

लेबनानची राजधानी बैरुत येथे काही दिवसांपुर्वी अमोनियम नायट्रेटच्या भीषण स्फोटात संपुर्ण शहर बेचिराख झाले होते. जवळपास 200 लोकांचा या घटनेत मृत्यू झाला होता, तर हजारो लोक बेघर झाले होते. असाच भीषण स्फोट महाराष्ट्राच्या पालघर येथील बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील नंडोलिया ऑर्गेनिक केमिकल फॅक्ट्रीमध्ये हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 3 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या कंपनीत जवळपास 14 लोक काम करत असल्याचे सांगितले जाते. या स्फोट एवढा भीषण होता की जवळपास 10 किमीपर्यंत याचे धक्के जाणवले.

पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनी माहिती दिली की, नंडोलिया ऑर्गेनिक केमिकल फॅक्ट्रीमध्ये हा भीषण स्फोट झाला. यात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.

या घटनेनंतर संपुर्ण परिसरात वायू पसरला आहे. जखमींना सध्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.