छत्रपती संभाजीराजेंची राज्यपालांकडे विनंती; राज्य मंत्रिमंडळाची दरवर्षी एक बैठक रायगड किल्ल्यावर घ्या


मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याच दरम्यान त्यांनी पायी चालत शिवनेरी किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला होता. त्यानुसार वयाच्या 79 व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून कोश्यारी हे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. यामुळे ही आपल्यासारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी सामाधान देणारी बाब आहे, असे बोलत संभाजीराजे यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे कौतूक केले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाची दरवर्षी एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावे, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

वयाच्या 79 वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी ‘पायी’ सर केला. आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी ही समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. माझी राज्यपाल महोदयांना अजून एक विनंती असेल, मी अनेक वर्षांपासून जी मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या ध्येयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल, संभाजीराजे म्हणाले आहेत.