बीसीसीआयला दिनेश कार्तिकची विनंती, धोनीची 7 नंबरची जर्सी रिटायर करा !


नवी दिल्ली – अखेरीस आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने पूर्णविराम दिला असून धोनीच्या निवृत्तीची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरताच त्याच्या सह खेळाडूंनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यातच धोनीसोबत २०१९ विश्वचषकादरम्यानचा आपला फोटो पोस्ट करत धोनीचा संघातील साथीदार आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनेही त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर दिनेश कार्तिकने आतापर्यंत धोनीसोबतच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्या नेहमी लक्षात राहतील. तसेच बीसीसीआय त्याची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करेल, अशी मला आशा असल्याचे म्हटले आहे.

भारतीय खेळाडू आणि त्याच्या जर्सीशी एक अनोखे नाते असते, ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सचिन तेंडुलकर आणि 10 नंबरची जर्सी हे २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील समीकरण प्रसिद्ध झाले होते. 10 नंबरची जर्सी घालून अनेक नवोदित क्रिकेटपटूही मैदानावर खेळताना दिसायचे. बीसीसीआयने सचिनच्या निवृत्तीनंतर 10 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर केली होती. त्यात पद्धतीने धोनीची जर्सीही रिटायर करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.