राज ठाकरेंच्या मागणीला यश, दोन दिवसात निघणार जिम सुरु करण्यासंबंधी आदेश


मुंबई – राज्यातील जिम सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून त्याची आगामी दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यभरातील जिम सर्व अटी-शर्थींचे पालन करुन सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे यांनी राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे केली होती. त्याचबरोबर जिम सुरु करण्यासंबंधी पत्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील जिम सुरु करावी अशी मागणी होत आहे. जिम व्यवसाय गेल्या चार महिन्यापासून अडचणीत होता. अनेकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही समस्या आहेत. म्हणून जिम सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व जिम चालकांना नियमावलीचे पालन करत जिम सुरु करण्याची परवानगी दोन दिवसांमध्ये देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, माझ्याकडे परवा प्रस्ताव आला असता सही करुन फाईल पुढे पाठवली आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली की राज्यात जिम सुरु करण्याची परवानगी दिली जाईल.

त्यांना राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मागणीबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, राज ठाकरेंची मागणीसुद्धा रास्त आहे. ती मागणी योग्य होती. मागणी कोणीही केली तरी सरकार सर्व बाजूंचा विचार करुन निर्णय घेत असते. फडणवीस, राज ठाकरे यांनी मागणी केली असली तरी सरकारने सर्व विचार करुनच निर्णय घेतला आहे.