सिल्व्हर ओकवर पार्थ पवारांची शरद पवारांशी तब्बल दोन तास चर्चा


मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर गुरुवारी रात्री शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. जवळपास दोन तास शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याच चर्चा सुरु होती. पण यावेळी नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारले होते. पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यासंबंधी शरद पवार यांना विचारण्यात आले असता, त्यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचे म्हणत फटकारले होते. अशा पद्धतीने शरद पवारांनी फटकारल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पार्थ पवार यांनी या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे.

भाजपकडून सातत्याने अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत असताना मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही महाविकास आघाडी सरकारकडून दिली जात आहे. त्याच वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र पार्थ पवार यांनी दिले होते. त्यांनी सोशल मीडियावर या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. दरम्यान पार्थ पवार यांनी द्याप या सर्व घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.