विशेष लेख; स्वातंत्र्य सर्वांगीण असावेे


लोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन याने लोकांची, लोकासाठी आणि लोकांनी चालविलेली राज्यव्यस्था अशी व्याख्या केली आहे पण तिच्यात लोक या शब्दाचा कितीही गवगावा केला असला तरीही जोपर्यंत लोक आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याबाबत सक्षम होत नाहीत तोपर्यंत हे स्वातंत्र्य लोकांचे होत नाही. समाजात आर्थिक विषमता असून काही लोक श्रीमंत आणि अनेक लोक गरीब असतील तर ते गरीब लोक लोकशाहीने त्यांना दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या स्थितीत असणार नाहीत. अशा लोकशाहीत काही ठराविक लोकच बहुजन समाजावर लोकशाहीच्या नावावर सरंजामशाहीतल्या रितीने राज्य करीत राहणार आहेत. लोकशाहीत घराणेशाही असावी की नाही यावर बरीच चर्चा होत आहे आणि जवळपास सगळ्याच पक्षांनी ती स्वीकारली आहे. अशा वेळी घराणेशाहीने सत्तेची पदे मिळवणारे लोक तिचे समर्थन करतात आणि नेत्याच्या मुलाने नेता होण्यात चूक काय असा सवाल करतात.

त्यांचे म्हणणे फार चूक नसले तरीही सामान्य कुटुंबातून पुढे येऊन मुले नेते का बनत नाहीत असा सवाल खडा होतो. कारण गरिबांमध्ये आपले नेतृत्व उभे करण्याची ताकद राहिलेली नाही. लोकशाहीचा हा अपमान आहे कारण विशुद्ध लोकशाहीत लोकांच्या नेतृत्वाला फार महत्त्व असते. लोक केवळ मतदान करतात म्हणून स्वतंत्र म्हणता येत नाहीत. ते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही स्वतंत्र असले पाहिजेत. एखाद्या गावात काही गरीब लोक गावच्या जमीनदारांचे नोकर असतील आणि आपल्या पोटासाठी ते त्या जमीनदाराच्याच हाताकडे पहात असतील तर ते लोक आपले राजकीय हक्क कसे काय राबवू शकणार आहेत ? आपला देश कधीकाळी परतंत्र होता. आपल्यापासून हजारो मैल लांबून आलेल्या मूठभर लोकांनी या देशावर गुलामी लादली होती. आपल्यावर १८५८ पासून ब्रिटन या देशाने राज्य केले आहे पण त्यापूर्वीची १०० वर्षेे या खंडप्राय देशातल्या सुमारे २५ कोटी लोकांवर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या काही हजार कर्मचार्‍यांनी आणि त्यांच्या अक्षरश: मुठभर अधिकार्‍यांनी राज्य केले आहे. एवढे कमी लोक या कोट्यवधी लोकांवर राज्य का करू शकले याचा विचार आपण प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला केला पाहिजे. तरच नव्या पिढीला आपल्या देशावर अशी वेळ कधीच येऊ नये असे वाटणार आहे.

आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे असेल तर आपल्याला त्या पारतंत्र्याचे स्मरण आणि त्यातून आत्मचिंतन करावे लागेल. ब्रिटीश लोक हे शिस्तप्रिय होते आणि त्यांनी आपल्यापेक्षा आधुनिक तसेच प्रभावी शस्त्रांचा वापर केला म्हणून आपण पराभूत झालो होतो. त्या काळात तंत्रज्ञान हा शब्द आणि संकल्पना फारशी परिणामकारक झालेली नव्हती. पण आता जीवन बदलले आहे आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग सनातनी लोकांच्या कल्पनेलाही झेपणार नाही ़इतका वाढला आहे. म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पुन्हा आपला देश परतंत्र होऊ नये यासाठी शिस्तीबाबत आणि आधुनिक विचारांचा स्वीकार करण्याबाबत जनतेचे आणि नव्या पिढीचे प्रबोधन करावे लागेल. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ही गोष्ट लक्षात घेतली होती. त्यांनी पंतप्रधान होताच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला गती दिली. त्यांनी ते काम केले म्हणून आपण आता अवकाशात एकाच दमात शंभरापेक्षाही अधिक उपग्रह सोडत आहोत. आपल्या देशाला आज जगातली अवकाश संशोधनातली महाशक्ती आणि आघाडीचा देश असा मान मिळाला आहे.

एकीकडे ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच आपल्याला आपला देश हा लोकशाहीप्रधानच राहील याची दक्षता घ्यावी लागेल. कारण रशिया आणि चीन असे साम्यवादी देशही प्रगती करीत आहेत पण त्यांची प्रगती तिथे लोकशाही नसल्याने व्यर्थ जात आहे. माणसाला मोकळा श्‍वास घेता आला पाहिजे कारण तो भाकरीइतकाच आवश्यक असतो. नाहीतर सार्‍या सुविधा हात जोडून समोर उभ्या आहेत पण त्यांचा लाभ घेण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्या संपत्तीला काही अर्थ रहात नाही. स्वातंत्र्य हे मानवतेच्या वाटचालीतले मोठे मूल्य आहे. ज्या देशांनी गरिबांच्या कल्याणासाठी म्हणून विचार स्वातंत्र्याची ’चैन (?)‘ नाकारली त्या देशातले लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत करीत समृद्धीचे फळे चाखत आहेत. काही वेळा त्यांना या मुस्कटदाबीचा असा काही वैताग येतो की, एकवेळ गरिबी परवडली पण हा विचार स्वातंत्र्याचा संकोच नको असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ येते. असे हुकूमशाही आणि धार्मिक नेत्यांची सत्ता असलेले देश हे निव्वळ कोंडवाडे झाले आहेत. म्हणून आपल्याला आपल्या देशाचे स्वातंत्र्य राखायचे आहे आणि त्याचे महत्त्वही आपल्या देशबांधवांना समजावून सांगायचे आहे. स्वातंत्र्य दिन त्यासाठीच साजरा करायचा असतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या देशबांधवांना आणखी एक संदेश द्यायचा आहे. स्वातंत्र्य म्हणजे माझे स्वातंत्र्य नव्हे तर माझ्यापेक्षा वेगळा विचार मांडणार्‍या माझ्या प्रतिस्पर्धी मित्राचे स्वातंत्र्य.

Leave a Comment