नया है वह, म्हणत छगन भुजबळांची पार्थ पवार प्रकरणी मार्मिक टिप्पणी


मुंबई – नातू पार्थ पवार यांच्यावर आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. बुधवारी शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो अजून इमॅच्युअर असल्याचे म्हणत फटकारले होते. दरम्यान शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली.

याबाबत खुद्द शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. ते थोडे अपरिपक्व असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. हिंदीत सांगायचे झाले तर नया है वह, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पवार कुटुंबात कोणीही नाराज नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

पवार कुटुंबियांचे आम्ही देखील सदस्य आहोत. शरद पवारांच्या वक्तव्यामुळे अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावले गेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचे, सुचवण्याचे, समजावण्याचे काम वरिष्ठ माणसे करतच असतात, असेही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.