जावेद मियांदादची इम्रान खानवर टीका; पाकिस्तानी क्रिकेटचे केले वाटोळे


इस्लामाबाद – पाकिस्तानी माजी क्रिकेटर जावेद मियांदादने पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेटचे वाटोळे केल्याची टीका केली आहे. क्रिकेटबद्दल अज्ञान असणाऱ्या व्यक्तींची पाकिस्तानी क्रिकेट बोर्डमध्ये निवड करुन इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेटचे वाटोळे केले आहे.

जावेद मियांदाद युट्युबवर रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे म्हणाले की, क्रिकेटची A, B, C देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती नाही. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी मी स्वतः या विषयावर चर्चा करणार आहे. मी देशासाठी योग्य नसलेल्या कोणत्याही माणसाला बोर्डावर काम करु देणार नाही. मियांदाद असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे सीईओ वसिम खान यांना अप्रत्यक्षरित्या उद्देशून म्हणाले की, एका परदेशी माणसाला तुम्ही बोर्डावर नियुक्त केले आहे. जर त्याने आपल्याकडून काही चोरले तर तुम्ही त्याला कसे पकडाल?.

मला सध्या पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे चांगले भविष्य बघायचे आहे. खूप खेळाडूंची पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संधी काढून त्यांना बेरोजगार केले आहे. या विषयावर या पूर्वीही मी बोललो आहे. परंतु, या गोष्टीचे गांभीर्य त्यांना अद्याप समजले नसल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी मियांदाद म्हणाले की, तुझा मी कॅप्टन होतो. माझा तु कॅप्टन नव्हतास. राजकारणात मी येईन आणि मग तुझ्याशी बोलेन. मी तुला या सर्व काळात लीड केले आहे. पण तु स्वतः आता देव असल्यासारखा वागत आहेस. देशात तु फक्त एकटाच हुशार आहेस असे वावरतो आहेस.

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, या देशाची तुम्हाला काळजी नाही. माझ्या घरी तुम्ही आलात आणि पंतप्रधान बनलात. पाकिस्तानी असण्याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे सर्व पाकिस्तानच्या सामान्य जनतेचे म्हणणे आहे. पण सामान्य जनता तुमच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही. म्हणून त्यांच्या वतीने मी बोलत असल्याचे मियांदाद म्हणाले.