पवारांच्या कौटुंबिक विषयात मी बोलणे योग्य ठरणार नाही – देवेंद्र फडणवीस


मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. आपण पार्थच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो अजून इमॅच्युअर असल्याचे शरद पवार म्हणत पार्थ पवारांना फटकारले होते. यानंतर यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा पवारांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले. त्याचबरोबर सीबीआय चौकशीवरुन शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आता आम्ही काय बोलावे. हा त्यांचा कौटूंबिक प्रश्न आहे. नातवाला आजोबांनी किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचे आहे किंवा आजोबांना आवडेल असे नातवाने वागायचे की नाही हे नातवाने ठरवायचे आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पण एक नक्की आहे की, त्यांनी सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नसल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.