बहुप्रतिक्षित ‘सडक २’चा ट्रेलर अखेर रिलीज


नुकताच संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘सडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले असून प्रत्येक भूमिकांची ओळख जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये करुन देण्यात आली असून ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळते.

संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तीचा (पूजा भट्ट) मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा जगण्यातील रस निघून जातो. अशातच त्याच्या आयुष्यात आर्या (आलिया भट्ट) एक नवीन उमेद घेऊन येते. संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मिळून कैलाश पर्वतावर जाण्यासाठी तयार होतात आणि या प्रवासात काय घडते याची कथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अभिनेते मकरंद देशपांडे यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. महेभ भट्ट यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षांनंतर दिग्दर्शन केले आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

त्यातच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर महेश भट्ट फार चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर आलिया भट्टलाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्यामुळे या चित्रपटाला नेटकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. सुशांतला ‘सडक २’ या चित्रपटातील भूमिकेची ऑफर आधी देण्यात आली होती अशी चर्चा होती. पण पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याला ती भूमिका दिलीच नव्हती हे महेश भट्ट यांनी स्पष्ट केले होते.