आता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही


मुंबई – राज्य सरकारने केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात असून या समितीमध्ये पाच कॅबिनेट मंत्री, दोन राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे.

यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या समितीच्या अध्यक्षपदी निवडीनंतर आमदार नितेश राणेंनी आदित्य यांची खिल्ली उडवली आहे. आदित्य यांच्या निवडीची नितेश राणे यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यासोबतच आता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, असेही म्हटले. नाईट लाईफ गँगसोबत दिनो एम. चे मोठे योगदान आहे, तरीही त्याला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, अशी आशा करुयात. वेट अँड वॉच असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे. नेहमीच ठाकरे कुटुंबाला आणि खासदार संजय राऊत यांच्यावर राणे बंधुंकडून टीका करण्यात येते, या निवडीवरुनही नितेश राणेंनी टीका केली आहे.