गुलाबराव पाटील यांच्या टीकेला नितेश राणेंचे प्रतिउत्तर


मुंबई: भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका केली होती. ८० टक्के लोकांचा नाणारला पाठिंबा असल्याचा दावा स्थानिक शिवसैनिकांनी केल्याचे सांगतिले जात आहे. नारायण राणेंनी त्यावर टीका केली होती. त्यांच्या त्या टीकेनंतर मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. पण आता भाजप नेते नितेश राणे यांनी देखील गुलाबराव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

आता नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नसल्यामुळे ते आधी वेगळे बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. या टीकेनंतर नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले की, गुलाब ज्यांच्या नावातच आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. काय टीका अशा माणसाबद्दल करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच टीका करायला ते दिवसातून किती तास शुद्धीत असतात. हे शुद्धीत कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, अशी खोचक टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.