FSSAI चा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; शाळेच्या परिसरात जंक फूडच्या विक्रीवर


नवी दिल्ली – फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता शाळेच्या 50 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील जंक फूड आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी बंदी घातली आहे.

शाळेच्या परिसरातील 50 मीटरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व जाहिरातींवर एफएसएसएएआयने बंदी घातली आहे. हे मोठे पाऊल शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने उचलल्याची माहिती मिळत आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार नवीन तत्त्वे एफएसएसएआय लागू करीत आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार आहार शालेय मुलांसाठी देणे हा त्याचा हेतू आहे.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे शाळेतील मुलांना सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार मिळेल. आरोग्याला अपायकारक असणाऱ्या अनेक गोष्टींचा जंक फूडमध्ये समावेश असतो. त्यामुळेच शाळेच्या परिसरात 50 मीटरपर्यंत याची विक्री आता करता येणार नाही. या जंक फूडमध्ये साधारण पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक, चिप्स, फ्रेंच फ्राईज, समोसा, पेस्ट्री, सँडविच, ब्रेड पकोडे इत्यादींचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

एफएसएसएएसआयला शाळेच्या कँटीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवरील नियम घालण्याचे आदेश 2015 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शाळांमधील मुलांसाठी निरोगी अन्न पुरवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. शाळेत कँटीन सुरू करण्यासाठी एफएसएसएआय कडून परवाना घ्यावा लागेल. पालिका अधिकारी व राज्य प्रशासन मुलांना सुरक्षित, चांगले भोजन मिळावे यासाठी शाळेच्या जागेची नियमित तपासणीही करणार आहे.