बंगळूरु – भाजपने मध्य प्रदेशात सत्तापालट करत सत्ता काबिज केल्यानंतर सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर सध्या टांगती तलवार आहे, त्यातच आता महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर भाजपचे सरकार येईल असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा; कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात येणार भाजपचे सरकार
महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यावर शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सध्या कोरोनाचे संकट आहे, हे संकट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात निश्चित भाजपचे सरकार येईल आणि महाराष्ट्राचा विकास हवा असेल, तर भाजपचेच सरकार पाहिजे, असे त्यांनी म्हटले. कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी शिरोळ येथील भाजप नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तसेच कोल्हापूरातील गेल्या २ वर्षातील महापूर स्थिती लक्षात घेतली असता दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय नव्हता, पण सध्या दोन्ही राज्यात समन्वय आहे. गेल्यावर्षी महापूराचा फटका दोन्ही राज्यातील जनतेला बसला होता. तो अनुभव लक्षात घेता दोन्ही राज्यातील सरकारमध्ये समन्वय राखल्यामुळे संभाव्य धोका नसल्याचा विश्वास मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला. पण महाराष्ट्रातील सरकारबाबत मंत्री जोल्ले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटस पडद्यामागे सुरु असल्याचे दिसून येते.