पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला ई-पाससाठी गणेशोत्सवाचा पर्याय


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. तेव्हापासून आजवर राज्यांतर्गत प्रवासावर बंदी करण्यात आली होती. त्याचबरोबर ई-पास अनिवार्य करण्यात आला होता. ई-पास शिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर गहन प्रश्न उभा राहिला होता. चाकरमान्यांची हीच गैरसोय लक्षात घेत मुंबई पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना आपल्या अधिकृत संकेतस्थळावर गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत आहे. आता गणेशोत्सवाचा पर्यायही यामध्ये सामील करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. https://mumbaipolice.co.in/ या लिंकवर क्लिक करून मुंबईतील चाकरमान्यांनी अर्ज करावा.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारने याबाबत रेल्वे खात्याला पत्र लिहिले आहे. प्रवाशांनी केलेल्या तिकीट बुकिंगनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत. आरक्षित तिकीट हाच ई-पास असणार आहे. रेल्वेने राज्य सरकारला याबाबत विचारणा केली होती.