योगींचे नाव घेताना चुकले मोदी; सोशल मीडियात होत आहे चर्चा


अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करताना चुकले, योगी आदित्यनाथ म्हणण्याऐवजी त्यांनी आदित्य योगीनाथ असे म्हटले. मोदींनी असा उल्लेख करताच योगी आदित्यनाथ यांची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होताच योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील विविध ठिकाणाची नावे बदलल्यामुळे याधीच सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय होते. आता त्यांचे नाव घेताना पंतप्रधानांकडून चूक झाल्यामुळे ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत. मोदी प्रभू राम मंदिरच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ जी. योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर चर्चेचा विषय झाले. ते ट्विटरवर दिवसभर ट्रेंडिंगमध्ये होते. यावर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत होते.

उत्तर प्रदेशमध्ये २०१७ साली भाजपचे सरकार आल्यानंतर येथील अनेक प्रसिद्ध ठिकाणांची नांवे बदलण्यात आली. अनेक नेटकऱ्यांनी हाच धागा पकडत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज, फैजाबाद तसेच ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय असे केले आहे.