भूमिपुजनाच्या दिवशी राजस्थानातील 50 मुस्लिम कुटुंबियांनी स्वीकारला हिंदू धर्म!


बारमेर : काल अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी राममंदिर भूमिपूजन सोहळा विधिवत संपन्न झाला. याच दरम्यान राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावातील 50 मुस्लिम कुटुंबियांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. याबाबत माहिती देताना हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांना मुघल काळात धमकावून मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. पण आम्हाला याबाबत कळल्यानंतर आम्ही पुन्हा त्याच धर्मात जायचे ठरवले. त्यानुसार 50 मुस्लिम कुटुंबियांतील 250 सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण कुटुंबिय हिंदू सण साजरे करत होते. त्यांच्या परिवारातील एका सदस्याने याबाबत सांगितले की, त्यांनी कधीच मुस्लिम पद्धतीने सण साजरे केलेले नाहीत. संपूर्ण कुटुंबाने राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधत होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला.

गावच्या संरपंचांना बोलवून या परिवाराने हवन केला. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लिम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते. पण आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, कोरोनाचे मोठे संकट सध्या जगावर आहे. त्यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला.

दरम्यान याबाबत माहिती देताना गावचे सरपंड प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, हिंदू धर्मचा स्वीकार करा असे आम्ही कोणालाही सांगितलेले नाही. या सर्वांनी स्वत:हून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. कोणतीही व्यक्ती भारतीय संविधानानुसार कोणताही धर्म स्वीकारू शकते.