नारायण राणेंना खोटे पाडत डिनो मोरियोने केला महत्त्वाचा खुलासा


भाजपचे नेते नारायण राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका करताना अनेक आरोप केले होते. पण अभिनेता डिनो मोरियोने त्यांच्या या आरोपातून हवाच काढली आहे. राणेंच्या आरोपावर डिनो मोरियोने उत्तर दिले आहे. मंगळवारी मुंबईत भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. राणे यांनी त्यावेळी अभिनेता डिनो मोरियोचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते.

आज नारायण राणे यांचे आरोप डिनो मोरियोने ट्विट करत फेटाळून लावले आहेत. 13 जून रोजी सुशांत सिंह राजपूतसाठी कोणत्याही पार्टीचे आयोजन करण्यात आले नव्हते, असा खुलासा डिनो मोरियोने केला आहे. तसेच, कुणावर आरोप करण्याआधी किमान सत्य परिस्थिती आणि अचूक माहिती तरी जाणून घ्या, उगाच कुणावरही आरोप करू नका, असे म्हणत नारायण राणेंना डिनो मोरियोने फटकारून काढले आहे. माझा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, कृपा करून माझे नाव यात घेऊ नका, अशी विनंतीही डिनो मोरियोने केली आहे.

अनेक राजकीय नेत्यांचे डिनो मोरियोच्या घरी येणे जाणे सुरू होते. सुशांत त्याच्याच घरी आला होता. 13 तारखेला घरी पार्टी झाली होती. या पार्टीला कोण कोण होते, त्यांची नावे का समोर आली नाही. त्यांना अटक का झाली नाही? असे सवाल राणेंनी उपस्थितीत केले. तसेच, अनेक मंत्री हे डिनो मोरियोच्या घरी का जातात. त्याच्या घरी एका मंत्र्याची आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे? त्यांना वाचवायचा प्रयत्न अधिकारी का करत आहेत. असा आरोपच राणेंनी केला होता.