देवेंद्र फडणवीसांनी भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात गायले भजन


मुंबई – आज बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. देशभरात आज भूमिपूजनाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. तर दुसरीकडे आपल्या घरांमध्येही भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रभू श्रीरामांचे पूजन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भूमिपूजनाच्या निमित्ताने भजन गायल्याचे पाहायला मिळाले.

देशात आज राम मंदिराच्या भूमिपूनजनाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायले. तर दुसरीकडे आपल्या कोल्हापूरमधील घरात गुढी उभारत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा सोहळा साजरा केला.

त्याचबरोबर खासदार प्रितम मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी घरातच रामाची पूजाअर्चना करत सोहळा अनुभवला. मुंडे भगिनींनी घरातच रामाची प्रतिमा, मूर्ती आणि रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक ठेवून प्रभू रामाचंद्रांची मनोभावे पुजा केली. त्याचसोबत मुंडे भवनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या शेजारी गुढी उभारून सोहळा साजरा करण्यात आला. प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांना मिठाई भरवून या भूमिपूजनाचा आनंद साजरा केला.

घर परिवारात वयाच्या आठव्या वर्षापासून ‘जय श्रीराम’ हा जयघोष ऐकत आले. मुंडे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने असंख्य लोकांना कारसेवक म्हणून गेलेले पाहिले, सन्माननिय अडवाणीजींची रथयात्रा पाहिली. त्यासर्वांचे प्रयत्न पूर्णत्वास घेऊन जाणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णदिन निश्चितच अभिमानाचा आहे, अशा भावना खासदार प्रितम मुंडे यांनी व्यक्त केल्या. तसेच भारताची नागरिक म्हणून या ऐतिहासिक घटनेचे प्रितम मुंडे यांनी स्वागतदेखील केले. तर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करत ‘जय श्रीराम !!’ असे कॅप्शन दिले.