बिहारमधील सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी वर्तवली रिया चक्रवर्तीच्या हत्येची शक्यता


पाटणा – बिहारमधील सत्ताधारी पक्ष असणारा जनता दल यूनायटेडने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता उघडपणे मतप्रदर्शन करत आपली भूमिका मांडत एक धक्कादायक शक्यता वर्तवली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा दिशा सालियनच्या ‘हत्ये’शी संबंध असल्याचे दिसत आहे, असे जेडीयूच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रकरणामागे असणारे लोक स्वत:ला वाचवण्यासाठी रिया चक्रवर्तीची हत्याही करु शकतात अशी शक्यताही जेडीयूच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील मत जनता दल यूनायटेडचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी मांडले आहे.

काहीतरी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत दोघांच्या मृत्यूचा संबंध असल्याची शक्यता रंजन यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर दिशा सालियनचे आत्महत्याप्रकरण मुंबई पोलिसांनी आटोपते घेतले आहे. तर दुसरीकडे आता सुशांत सिंह प्रकरणामध्येही ते योग्यपणे चौकशी करत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणामधील बराचसा तपशील ४५ दिवसांनंतरही पोलिसांनी गोळा केलेला नाही हे ही लक्षात घ्यायला हवे, असे रंजन म्हणाले. पक्षाने आपली भूमिका मांडणारा एक व्हिडिओ जारी केला आहे, त्यामध्येच रंजन या प्रकरणाबद्दल बोलताना दिसत आहेत.

एक समान धागा दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आहे, तो म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया चक्रवर्तीची काही महत्वाच्या लोकांच्या सांगण्यावरुन हत्याही केली जाऊ शकते. रियाने पोलीस संरक्षण घ्यायला हवे, कारण या प्रकरणामध्ये रिया संशयित आणि मुख्य साक्षीदारही आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी तिने न्यायालयाकडे मागणी करायला हवी, असेही रंजन म्हणाले आहेत. या प्रकरणाकडे तुकड्या तुकड्यांमध्ये न बघता तपास यंत्रणांनी याचा एकत्रितपणे तपास करावा अशी मागणीही रंजन यांनी केली आहे.

रंजन यांनी मुंबई पोलिसांच्या तपास करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी न्याय देण्याच्या विचारानुसार काम केले पाहिजे, असे रंजन म्हणाले आहेत. बिहार पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सुपूर्द करावे. बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास करावा, अशी मागणी रंजन यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये सुशांतच्या वडीलांनी तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांची एक तुकडी तपासासाठी मुंबईत आली आहे. तेव्हापासूनच मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमध्ये वाद दिसून येत आहे. मुंबई पोलीस आम्हाला तपासासाठी सहकार्य करत नसल्याची तक्रार बिहार पोलिसांनी केली आहे.