सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात आता नारायण राणेंची एंट्री


मुंबई : मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या तपासावरुन गदारोळ सुरु असून याच दरम्यान आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच या वादात आता भाजप नेते नारायण राणे यांनी देखील उडी घेत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिची आत्महत्या नसून हत्या आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा असल्यामुळे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करायला हवा, असे नारायण राणे म्हणाले. त्याचबरोबर मुंबई पोलीस सुशांत सिंह प्रकरणात कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्नही यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला.

सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे गाजत आहे. या विषयाकडे सरकार न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. तेच अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. राज्य सरकारची याप्रकरणी चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचे आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली, पण मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अद्यापही एफआयआर दाखल केला नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

या प्रकरणी बिहारमध्ये एफआयआर दाखल झाला. पण मुंबईत दाखल झाला नाही. त्याच्या आत्महत्येला 50 दिवस झाले, मुख्य आरोपी कोण आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. मुंबई पोलिसांची जगात ख्याती आणि नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होते? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिले, तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले.

सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. तीन तास ते तिथे काय करतात? ते 13 तारखेला तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येत आहे, याचा अर्थ अधिकारी कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नसल्याचे नारायण राणे म्हणाले.

या सरकारचे काम न करणे हेच धोरण आहे. आज कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मुंबईत हजारोंपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी सरकारला काही वाटत नाही. हजारों लोकांचा मृत्यू? हा छोटा आकडा आहे का. सरकार यावर का बोलत नाही? या सरकारला निरपराध लोकांचा खून करण्याचे लायसन्स दिलेले नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. यासह विविध मुद्द्यांवरुनही त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.