नितीश कुमारांनी केली सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस


पाटणा – 14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत असतानाच त्यात अचानक बिहार पोलिसांची एंट्री झाली आणि त्यांनी आपल्यापरिने या प्रकरणाचा तपास करु लागले. पण आता त्यामुळे या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवगेळी वळण मिळत आहेत. त्यातच मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात सुशांतच्या तपासावरून आरोप प्रत्यारोप सुरू असून, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

वेगवेगळ्या शंका आणि प्रश्न सुशांतच्या आत्महत्येनंतर उपस्थित करण्यात येत आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी पाटणा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू केला. पण मुंबई पोलिसांकडून सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप आता बिहार पोलिसांकडून केला जात आहे. त्यातच ईडीने देखील याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा दोन्ही पोलीस यंत्रणाकडून तपास सुरू असतानाच सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. सुशांतच्या वडिलांशी पोलीस महासंचालक यांचे सकाळी बोलणे झाले. सीबीआय चौकशी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस करत असल्याचे नितीश कुमार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.