मनसेचा ठाकरे सरकारला चाकरमान्यांवरुन खळखट्याकचा इशारा


मुंबई: आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगामी काही दिवसात आगमन होणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या या उत्सवाचे वेध लहानग्यांपासून मोठ्यांना लागून राहिले आहे. पण यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या संकटामुळे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी हे कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी उत्सुक आहेत. पण कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास काढण्यादरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार अर्ज करूनही त्यांचे ई-पास नामंजूर होत असल्यामुळे चाकरमान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पास नामंजूर होणाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारे सर्वाधिक असून दुसरीकडे ई-पासच्या नावाखाली कोकणवासियांची काही दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर ई-पाससाठी कोणतेही शुल्क नसताना मोठ्या प्रमाणात पैसे आकरण्यात येत असल्यामुळे ई-पासचा काळाबाजार करुन चाकरमान्यांची फसवणूक करणार्‍या दलालांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठोकून काढेल, असा इशारा त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

ई-पाससाठी सर्वसामान्य व्यक्तीने अर्ज केला तर त्याला ई-पास मिळत नाही. पण तोच जर का एखाद्या दलालाने केला तर त्याला तात्काळ ई-पास मिळतो, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच संपूर्ण राज्यभरात ई-पासचा काळाबाजार चालत असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी यासबंधित एक ऑडिओ क्लिप देखील ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामुळे राज्य सरकार ई-पासचा काळाबाजार करणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात मनसे मार्फत सोडण्यात येणाऱ्या बसेस ची नोंदणी सुरू झाली असून नोंदणी करता सरकारी नियमाप्रमाणे आधार कार्ड आणि वैद्यकीय पत्र अनिवार्य आहे.