श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही


नाशिक: जसाजसा अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जवळजवळ येत चालला आहे तसतसे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना रामजन्मभूमी न्यासाने आमंत्रित केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यामध्ये समावेश नसल्यामुळे सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपवर चांगलीच आगपाखड केली. त्यांनी म्हटले की, श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी, असा टोला आव्हाड यांनी भाजपला लगावला.

रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकच्या सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी असते. भाजपने गेली ४० वर्ष रामाच्या नावावर राजकारण केले, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केले, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.