‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नचे कौतुक


मुंबई : धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर कौतुक झाले असून मुंबई महानगरपालिकेने अनेक आव्हाने असतानाही कोरोना विषाणूचा अत्यंत परिणामकारकपणे सामना केला, असे गौरवोद्गार जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वृतपत्र असलेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने काढले आहेत. जगासमोर कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान असताना या विषाणू संसर्गावर आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासन यशस्वी झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेने याआधी धारावीसह मुंबईतील कोरोना नियंत्रणासाठी उभारलेल्या लढ्याचे देखील जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केल्यानंतर आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने देखील या कामाची दखल घेत गौरव केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना यश आल्याचे म्हटले जात आहे. पण असे असले तरी या यशाने हुरळून न जाता यापुढेही कोरोनाविरुद्धचा लढा सुरु राहील, असा निर्धार मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या लेखातून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी पारदर्शक असून पालिकेचे काम परिणामकारक असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर आता या वृत्तपत्राने शुक्रवारी (31 जुलै) विशेष लेखातून पुन्हा धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला आलेल्या यशाचे कौतुक केले. धारावीमधील कोरोना विरोधातील लढ्याने दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या अन्य शहरांसाठी आदर्श निर्माण केला आहे, असे कौतुक या लेखात करण्यात आले आहे.