ट्रम्प यांचे कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन


वॉशिंग्टन – जगभरातील बहुतांश देशांवर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावले असून त्यातच या कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगभरातील अनेक देश या संकटापासून सुटका व्हावी यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशातच प्लाझ्मा थेरेपी ही कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच भारतात देखील काही कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकन रेड क्रॉसच्या मुख्यालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी दौरा केला. त्यांनी त्यावेळी कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणूवरील उपचार शोधण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जर तुम्ही कोरोनामुक्त झाला असाल तर इतरांचे जीवन वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करा. आपण एकत्रितरित्या या संकटावर मात करू, असे ट्रम्प यावेळी म्हणाले.

दरम्यान, प्लाझ्मा थेरेपीची कोरोनाचा सामना करण्यासाठी मदत होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. कोरोनाचा सामान्य रुग्ण याद्वारे ५ दिवस आधीच कोरोनातून बाहेर येत असल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत अमेरिकेत ४६.२९ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी २२ लाखांपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अमेरिकेत सद्यस्थितीत २१.९७ लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत.