अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आता १० ऑगस्टला सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भाव लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा यावर्षी होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये अशी भूमिका घेतल्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना आज याबाबतची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. तसेच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखली होती. पण यूजीसी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होती. तसेच आमचा सप्टेंबरनंतर परीक्षा घेण्याचा प्रयत्न असल्याचे यूजीसीने सांगितले आहे. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी आता या प्रकरणावरील सुनावणी होणार आहे.