राज्यातील अनलॉकवर राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका


मुंबई – कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील परिस्थिती पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. त्यातच राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली, तरी देखील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. पण कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, अनेक आर्थिक प्रश्नांनी डोके वर काढले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या अनलॉकच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

एबीपी माझ्याच्या माझा महाराष्ट्र, माझे व्हिजन या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, आपण २३ मार्चपासून या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. त्याचा सुरूवातीला कुणालाच अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. पण त्यातच आपण आजचा आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडत आहात. हा आकडा माझ्या प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत. यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिले, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणे गरजेचे आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितले की, आता बस झाले, लोकांना जास्त काळ वेठीस धरू शकत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय चुकला का?, या प्रश्नावर बोलताना म्हणाले, मी काही यातील तज्ज्ञ नाही आणि डब्ल्यूएचओही माझ्याकडून काही सल्ले घेत नाही. पण सुरूवातीला मी डॉक्टरांशी बोललो होतो. त्यांचे म्हणणे होते की, सुरूवातीच्या काळातच कडक लॉकडाउन पाळणे गरजेचे होते. जो पाळला गेला नाही. आता ही गोष्ट आपल्या हाताबाहेर गेली आहे. मंत्रालयात बैठकीला मी गेल्यानंतर म्हणालो होतो की, आपल्याला या विषाणूंसोबत जगायला शिकावे लागेल, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.