अखेर भारतात ‘राफेल’चे ‘हॅप्पी लँडिंग’


नवी दिल्ली – मागच्या दोन-तीन वर्षांपासून येणार.. येणार.. म्हणून ज्याची चर्चा होती, ते ‘राफेल’ लढाऊ विमानाचे आज भारतात ‘हॅप्पी लँडिंग’ झाले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात राफेलची तुकडी दाखल होताच, राफेलच्या वैमानिकांना नौदलाने ‘हॅप्पी लँडिंग’च्या शुभेच्छा दिल्या. यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकात्ता या युद्धनौकेबरोबर संपर्क साधला.

अंबालाच्या एअर फोर्स बेसवर पाच राफेल फायटर विमानांनी लँडिंग केले. राफेलचा कायमस्वरुपी तळ येथेच असणार आहे. सोमवारी सकाळी या विमानांनी फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन उड्डाण केले होते. ही विमाने संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

ही विमाने घेऊन भारतात फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक आले. IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन समावेश करण्यात येईल.

हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला देण्यात आले आहे. फ्रान्सबरोबर २०१६ साली भारताने अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात आली आहेत. लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

अंबाला एअर बेसवर राफेलचे पहिले स्क्वाड्रन तर पश्चिम बंगाल हाशिमारा येथे दुसरे स्क्वाड्रन असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे,तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. त्यातच सध्याच्या घडीला चीन आणि पाकिस्तानाच्या हवाई दलात राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही आहे.