राफेलच्या समावेशामुळे चीनची चिंता वाढेल, असे वाटत नाही – शरद पवार


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भारतीय हवाई दलात सामील होणाऱ्या राफेल विमानांवर सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या हवाई दलात राफेल विमानांचा समावेश होणार आहे, ही देशासाठी नक्कीच चांगली बाब आहे. या विमानांच्या समावेशामुळे हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राफेलच्या समावेशामुळे चीनच्या चिंतेत भर पडेल, असे मला तरी वाटत नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी भारताने ३६ राफेल विमानांसाठी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमाने भारताला मिळाली आहेत.

चीनसोबत असलेल्या तणावावर आपण नक्कीच गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्याने चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. कारण आपल्यापासून ते खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नसल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. भारताने जर सुरक्षेच्या दृष्टीने १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. चीनला भारताच्या हवाई दलात राफेलच्या येण्याने काळजी वाटेल, असे मला तरी वाटत नाही. राफेलचा हवाई दलात समावेश ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे हवाई दलाचे सामर्थ्य नक्कीच वाढणार आहे. पण ते गेमचेंजर ठरेल असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काँग्रेसने १०० टक्के राफेलसाठी पुढाकार घेतला होता आणि त्यापर्यंत १०० टक्के भाजप पोहोचल्यामुळे त्यात श्रेयवादाचा कोणता प्रश्नच उद्धभवत नसल्याचे पवार राफेलच्या सुरू असलेल्या श्रेयवादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.