आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरुन शेअर करण्यात आला पृथ्वीवर पडणाऱ्या विजांचा व्हिडीओ


आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु झाला की आपल्याला पाऊस पडणार असल्याचा अंदाज येतो. पण या कोसळणाऱ्या विजांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे, त्याचबरोबर अनेकांच्या संपत्तीचे नुकसान झाल्याचे आपण ऐकले असेल. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी असा शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे.

पण याचदरम्यान ही वीज आकाशात कशी तयार होते आणि या विजेपासून सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे याबद्दचे अनेक सल्ले आणि लेख आपल्या अनेकदा वाचनात येतात. भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वीज पडून अनेकजण मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्यातच सोशल मीडियावर आपण एखाद्या झाडावर किंवा इमारतीवर वीज पडल्याचे व्हिडिओही व्हायरल होता असतात. पण अंतराळातून ही वीज कशी दिसते हे दाखवणारा एक व्हिडिओ अंतराळवीराने पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह कोसळणारी वीज अंतराळामधून कशी दिसते हे दाखवणारा व्हिडिओ नॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉटीक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाचा अंतराळवीर बॉब बेहकीन याने ट्विट केला आहे. पृथ्वीवर पडणारी वीज पृथ्वीपासून शेकडो किमीवरुन कशी दिसते याचा एक व्हिडिओ मागील काही आठवड्यांपासूनच बातम्यांमध्ये असणाऱ्या स्पेस एक्समधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या बॉबने पोस्ट केला आहे. बॉबने शेअर केलेल्या या ९ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काळ्या ढगांमध्ये चमकणाऱ्या विजा दिसत आहेत. अंतराळातून अशी दिसते वीज. त्या व्हायलेट फ्रिंज थक्क करणाऱ्या असल्याचे बॉबने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे.

दोन हजारहून अधिक जणांनी बॉबने पोस्ट केलेला हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तर या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या क्रीस कॅसडी या अंतराळवीराने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन रविवार २१ जून रोजी झालेल्या सूर्यग्रहणाचे फोटोही जून महिन्यामध्ये शेअर केले होते. सूर्यग्रहण अंतराळातून कसे दिसते हे दाखवणारे फोटो आणि जीफ चांगल्याच व्हायरल झालेल्या.