मध्य प्रदेशात होणार Exam From Home !


भोपाळ : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नोकदरांना घरुनच काम म्हणजेच Work From Home करावे लागत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून अंतिम वर्षांच्या परीक्षांवरुन सुरु असलेला गोंधळ कायम आहे, त्याचबरोबर या परीक्षा होणार की नाही आणि होणार तर कधी होणार? असा प्रश्न देशभरातील विद्यार्थ्यांना पडलेला असतानाच एक्झाम फ्रॉम होम म्हणजेच घरी बसून परीक्षा देण्याची सुविधा मध्य प्रदेश सरकारने उपलब्ध केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांवरुन सरकार विरुद्ध यूजीसी असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. पण महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षांसाठी ओपन बुक प्रणालीचा उपाय मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने शोधला आहे.

या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवली जाईल, ज्याची उत्तरे घरात बसूनच उत्तरपत्रिकेत लिहावी लागणार आहे. ओपन बुक प्रणालीतून मिळवलेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज आणि मागील वर्षांत मिळवलेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज यावरुन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होईल. मध्य प्रदेशात यंदा 5 लाख 71 हजार विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत.

पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांसह पीजीच्या तिसऱ्या सेमिस्टर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणांच्या सरासरीनुसार पास करण्याचे आदेश सरकारने जारी केले होते. पण उच्च स्तरावर अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत चर्चा सुरु होती. अंतिम वर्षाच्या परीक्षेतही प्रमोट केल्यास शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केले जातील, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. त्यातच यूजीसीनेही सुधारित नियमावली जाहीर करत सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याच्या निर्देश दिले आहेत. यानंतर मध्य प्रदेश सरकारने ओपन बुक प्रणालीनुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका त्यांच्या लॉग इन आयडी आणि निश्चित वेबसाईटवर उपलब्ध केल्या जातील. घरी राहूनच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्याची सोय असेल. घराजवळच्या एखाद्या शाळेत ही उत्तरपत्रिका जमा करुन त्याची पावती विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल. याशिवाय ई-मेल आणि पोस्टाद्वारे उत्तरपत्रिका पाठवण्याची सुविधाही असेलच. विद्यार्थी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करु शकतात. विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची प्रणालीही तयार करण्यात आली आहे. ओपन बुक प्रणालीद्वारे मिळालेल्या गुणांचे मूल्यांकन 50 टक्के असेल, तर उर्वरित 50 टक्के हे मागील वर्षाच्या प्राप्त गुणांवरुन निश्चित केले जातील.

ओपन बुक परीक्षा प्रणाली म्हणजे काय?
विद्यार्थ्यांना ओपन-बुक परीक्षा प्रणालीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपले नोट्स, पाठ्यपुस्तकांची मदत घेण्याची परवानगी असते. आपल्या घरात बसून विद्यार्थ्यांना वेबपोर्टलहून आपापल्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका डाऊनलोड करुन त्यांची उत्तरे उत्तरपत्रिका लिहिण्याची सुविधा दिली जाते. पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या तसंच पीजी दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना जनरल प्रमोशन देण्याचा आदेश आधीच जारी केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे मागील वर्षांचे गुण आणि चालू सत्राच्या अंतर्गत गुणांच्या सरासरीवरुन आगामी सत्राची प्रवेश प्रक्रिया घेतली जाईल.