राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार - Majha Paper

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार


मुंबई – भाजपध्य़क्ष जे पी नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संवाद साधताना पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना आपण आजही राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेसोबत राज्याच्या हितासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार असून पण शिवसेना आणि भाजप एकत्र आले तरी निवडणूका मात्र आम्ही वेगवेगळ्या लढू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सध्या शिवसेना खूप हवेत असून त्यांना स्वर्गाला बोटे टेकल्यासारखे वाटत असल्याची टीका त्यांनी केली असून ते ऐकतील असे वाटत नसल्याचेही म्हटले आहे.

उद्धव ठाकरे, अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लोकसभा निवडणुकीत युती करताना चर्चा झाली होती. युतीबाबत आणि मुख्यमंत्रिपदाबाबतही या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या चर्चा झाली होती. पण दोन्ही पक्षात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द दिल्याचा दावा उद्धव ठाकरे वारंवार करीत होते, तर मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द दिलाच नसल्याचे भाजप नेते सांगत होते. त्यामुळे अखेर शिवसेनेने युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात आघाडी सरकार स्थापन केले.

दरम्यान भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्या आहेत. आपली पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची तयारी असली पाहिजे. आजपासूनच आपल्याला याची तयारी करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे. भाजप महाराष्ट्रात एकटी कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे.